औरंगाबाद- मुळव्याधच्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या 22 वर्षीय तरुणीवर चुकीचा उपचार केल्याने तीचा मृत्यू झाला आहे. ती बी.फार्मसीचे शिक्षण घेत होती. ही घटना शहरातील मुकुंदवाडी भागात घडली. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. हेमा अनिल वाघमारे (वय 22 रा. इंदिरानगर, मुकुंदवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मृत हेमाला मागील महिनाभरापासून मूळव्याधीचा त्रास होत होता, त्यामुळे तिचा मुकुंदवाडी येथील सुखायू सुश्रुत रुग्णालयात डॉक्टर शिवकुमार गोरे यांच्याकडे उपचार सुरू होते. या रुग्णालयात कमी किमतीत उपचार करण्यासाठी एक शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्या शिबिराचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. हेमा शुक्रवारी दुपारी उपचारासाठी गोरे यांच्याकडे रुग्णालयात गेली होती. तेथे गोरे यांनी हेमाला कमी किमतीचे आमिष दाखवत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी हेमा तयार झाली व तिला संध्याकाळी 6 वाजेची वेळ देण्यात आली. संध्याकाळी साडेसहावाजता डॉक्टरांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले व 15 मिनिटांत तिला बेशुद्धावस्थेत ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर बीपी लो झाल्याचे सांगत डॉक्टर गोरे तेथून निघून गेले.