छत्रपती संभाजीनगर : Ghati Hospital Death:औषधांच्या तुटवड्यामुळे नांदेड जिल्ह्यात एका दिवसात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता संभाजीनगरमध्ये देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सरकारी रुग्णालयात २४ तासात २ लहान बालकांसह १८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता राज्यातील गरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयात योग्य उपचार मिळत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडं, या मृत्यूंना सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
रुग्णालयात पुरेशी औषधी उपलब्ध नाही : छत्रपती संभाजीनगर शहरात असलेलं घाटी रुग्णालय गोरगरिबांचं रुग्णालय म्हणून प्रचलित आहे. इथं विदर्भ मराठवाड्यातील अनेक शहरांमधून रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र आता हे उपचार किती योग्य, असा प्रश्न विचारला जातोय. रुग्णालयात पुरेश्या प्रमाणात औषधी उपलब्ध नसून पुढील काही दिवस पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राज्य सरकार गरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळत आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय.
मागील चोवीस तासात चौदा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्याची कारणं वेगवेगळी आहेत. यामध्ये दोन नवजात शिशुंचा समावेश आहे. हे मृत्यू आणि औषधी तुटवडा यांचा संबंध लावता येणार नाही. - डॉ. विजय कल्याणकर, वैद्यकीय अधिष्ठाता
बाहेरुन औषधं आणावी लागतात : घाटी रुग्णालयात रुग्णांना अत्यल्प दरात उपचार दिले जातात. त्यात औषधांचा देखील समावेश आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून रुग्णालयाला मुबलक औषधं मिळत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषध आणण्यासाठी सांगितलं जातं आहे. त्यांना एक चिठ्ठी देऊन खासगी औषधी विक्रेत्याकडून औषध आणावी लागतात. मात्र याचे दर गोर-गरीबांना परवडत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक कशीबशी औषधांची व्यवस्था करत असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. असं असलं तरी याबाबत राज्य सरकारनं कधीही योग्य पावलं उचलण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला नाही. परिणामी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
सरकार जबाबदार : 'सरकारी रुग्णालयात रुग्णांचे बळी जात आहेत. सरकार अजून किती रुग्णांचे बळी घेणार', असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. 'ठाणे, नांदेड यासह इतर ठिकाणी रुग्णांचे मृत्यू होत आहेत, कारण औषधांची खरेदी अद्याप झालेली नाही. औषधांबरोबर ऑर्डर देऊनही औषध मिळत नाहीत. सरकारनं नवीन कायदा आणला, तरी त्याचा उपयोग अद्याप झालेला नाही. सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जातात. त्याला 'आपला दवाखाना' 'इतर दवाखाना' अशी नावं दिली जातात. मात्र त्याचा काय उपयोग? अशा पद्धतीनं जर जीव जात असेल, तर संबंधितावर कारवाई करावी आणि या प्रकरणावर सरकारनं बोलावं', अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
हेही वाचा :
- Nanded Hospital Death : ५०० खाटांच्या रुग्णालयात १२०० रुग्णांवर उपचार सुरु, प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस
- Sharad Pawar On Nanded Death Case : नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरण; हे सरकारी यंत्रणांचं अपयश, शरद पवारांचा हल्लाबोल