महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

औरंगाबादमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पुंडलीकनगर पोलिसांनी ही कारवाई करत तीन आरोपींना गजाआड केले. आरोपींमध्ये एका परप्रांतीयाचा समावेश आहे.

जप्त करण्यात आलेल्या नोटा

By

Published : Nov 1, 2019, 7:43 PM IST

औरंगाबाद - कलर प्रिंटरच्या मदतीने 100 रुपयांच्या बनावट नोटा तयार करून रिक्षा चालकांच्या मदतीने त्या बाजारात पसरवणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. पुंडलीकनगर पोलिसांनी ही कारवाई करत तीन आरोपींना गजाआड केले. आरोपींमध्ये एका परप्रांतीयाचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुंडलीकनगर पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला


शेख सलमान उर्फ लक्की रशीद शेख (रा.जसवंतपुरा, नेहरूनगर), सय्यद सैफ सय्यद असद (रा.नेहरूनगर, कटकट गेट), सय्यद सलीम सय्यद मोहम्मद यार (रा. कृष्णनगर, रांजणगाव शेनपुंजी, मूळ आजमगड, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी सलमान उर्फ लक्की हा त्याच्या घरात एका कलर प्रिंटरच्या सहाय्याने खऱ्या नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करत होता. त्या बनावट नोटा तो तीस टक्केच्या भावाने रिक्षा चालक सैफला द्यायचा. सैफ हे पैसे अर्ध्या किमतीत म्हणजेच 10 हजाराची बनावट नोट पाच हजारात रिक्षा चालकांना द्यायचा. मागील अनेक महिन्यांपासून या टोळीचा हा गोरखधंदा शहरात व परिसरात सुरू होता.

हेही वाचा - 'भाजपला सरकार स्थापन करता आले नाही तर, पर्यायी सरकार स्थापन करू'


बनावट नोटांची विक्री होणार असल्याची माहिती गुप्त माहितीदाराने पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या घनश्याम सोनवणे यांना दिली. त्या माहितीवरून पुंडलीकनगर पोलिसांनी जागृती पेट्रोल पंपामागील मनपाच्या उद्यानात सापळा रचला. तेथे सैफ बनावट नोटा घेऊन आला तर ते पैसे कमी किमतीत घेण्यासाठी सलीम आला. याच दरम्यान पोलिसांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - तिकीट वाटपात पैसे घेतले'; इम्तियाज जलील यांच्यावर पक्षातील माजी पदाधिकाऱ्याचा आरोप


चौकशीदरम्यान त्यांनी बनावट नोटा तयार करणारा म्होरक्या जसवंतपुरा भागात राहत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी जसवंतपुरा येथील एका घरातून सलमानला अटक केली. त्याच्या घरातून कलर प्रिंटर, कटर, स्केल पट्टी असे बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले. 10 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह (एम. एच. 20 डी. एच. 8322) दुचाकी असा 86 हजार 200 रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही या टोळीचा संबध आंतरराज्यीय टोळीशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details