सिल्लोड (औरंगाबाद)- देशात कोरोनाचा कहर सुरू झाल्याने सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली. यामुळे बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये बंद करण्यात आली. या दरम्यान सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल झाले, अनेकांचे काम धंदे बंद पडल्याने एक वेळच्या जेवणाची चिंता असताना शासनाने ऑनलाइन शिक्षण देण्याचे आदेश शाळा महाविद्यालयांना दिले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्टफोनची आवशकता होती. एक वेळच्या जेवणासाठी गोर गरिबांचे हाल होत असताना महागडा मोबाईल कसा आणणार अशा विवंचनेत पालक वर्ग होता. मोबाईल नसल्याने शिक्षण बुडत असल्याने गरीबाच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत होते, अशा परीस्थितीत सिल्लोड येथील सर्वंसामान्य घरातील दोन जावा समोर आल्या आहे.
सिल्लोड येथील प्रिया विशाल आरसूड व पूजा विक्रम आरसूड दोघी नात्याने जावा आहेत. त्यांच्या कुटुंबाची सेवाभावी वृत्ती परिसरात सर्वश्रूत आहे. अशा सेवाभावी कुटुंबातील पदवीधर महिलांनी समाजातील गोर गरीब जनतेच्या गरिबीची जाण ठेवत ज्या मुलांकडे स्मार्टफोन नाहीत अशा 25 ते 30 मुलांना एकत्र आणत त्यांच्या-त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिकवायला सुरुवात केली. दिवसागणिक मुलांना त्यांच्या शिकवण्याची गोडी लागायला लागली.