औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेने मते मागितली. मात्र, भाजपशी काडीमोड करून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचा आरोप एका मतदाराने केला आहे. त्याविरोधात त्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, चंद्रकांत खैरे आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात फसवणूक केल्याची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
औरंगाबादेतील मतदाराची पोलीस ठाण्यात तक्रार विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप, शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला. मात्र, मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू होता. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिला. तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर महिन्यापूर्वीच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
औरंगाबादेतील मतदाराची पोलीस ठाण्यात तक्रार हे वाचलं का? - शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; निरुपम यांचा काँग्रेसला घरचा आहेर
औरंगाबादेतील मतदार रत्नाकर भीमराव चौरे यांनी शिवसेनेच्या विरोधात तक्रार दाखल केली. १ महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल, चंद्रकांत खैरे यांनी 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला. यावेळी हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी शिवसेना भाजप युतीला मतदान करा, असे सांगितले होते. या अश्वासनावर मी व माझ्या कुटुंबाने विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान केले. निवडणुकीचा निकाल पाहता भाजप समर्थकांच्या मतावर शिवसेनेचे जैस्वाल निवडून आले. मात्र, निकालानंतर शिवसेनेने भाजप पक्षाशी असलेली युती तोडून सरकार स्थापन केले नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचे आम्हाला वाटत आहे, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.