औरंगाबाद- कोणाचेही सरकार येऊ द्या, सरकारकडे पैसे नाहीतच. सगळे सोंग करता येतात पैशांचे सोंग करता येत नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. मी केंद्र सरकारच्या बजेटवर काम करत नाही. मात्र, पैसे असतील तर ते गावात गरिबांसाठी काम करण्यासाठी खर्च केले पाहिजे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. औरंगाबादेत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 4 दिवसीय महाएक्सपोचा समारोप झाला, यावेळी ते बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले, लोक आता रस्त्याची कामे कशी झाली हे विचारतील. मात्र, मी खासगी पार्टनरशिपच्या माध्यमातून काम पूर्ण करतो. सगळ्या बँकेचे लोक मागे लागले आहेत. माझ्या बँकेचे कर्ज घ्या म्हणून, तीन चार लाख कोटी माझ्या खिशात आहेत, अशीही टोलेबाजी गडकरींनी यावेळी केली. विकासाची कामे सुरू करता येतात. मात्र, कोणी त्रास दिला नाही पाहिजे. मी पैसे आणतो, मला अडचण नाही, मी 17 लाख कोटींचे काम केले. मात्र, मी कोणत्या ठेकेदाराला एक पैशाच्या कामासाठी कधी घरी बोलावले नाही. आमच्याकडे काम सुरू झालं की आमदार, खासदार कॉन्ट्रॅक्टरला म्हणतात काम नंतर सुरू कर आधी आम्हाला भेट.., असे म्हणत गडकरींनी लोकप्रतिनिधींनाही टोला लगावला. अशा प्रकारच्या वृत्तींना मी कंटाळलो आहे, त्यामुळे मी सीबीआय अधिकाऱ्यांना सांगितले आहे, की भेटेल त्याला पकड. हे दुसरीकडे नाही मराठवाड्यातच सुरू असल्याचेही ते म्हणाले.
सह्याद्रीचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्राला वाहून जाते. मात्र, आता ते पाणी गोदावरीत सोडण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. फक्त त्या प्रोजेक्टवर महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची सही होणे बाकी आहे. यामुळे जायकवाडी सतत शंभर टक्के भरेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.