छत्रपती संभाजीनगर Four Friends Death : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव येथील बनकरवाडी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह तलावाच्या बाहेर काढले. यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता घाटी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासणी करुन ते मृत झाल्याची पुष्टी केली. बिस्वजीत कुमार, अफरोज जावेद शेख, अबरार जावेद शेख आणि कुणाल दळवी अशी या मित्रांची नावं आहेत. विशेष म्हणजे यात दोन भावांचादेखील समावेश आहे.
खेळण्यासाठी गेले होते तलावाकडे : रांजणगाव येथील अफरोज आणि अबरार शेख हे दोन भाऊ त्यांचे मित्र बिस्वजित कुमार आणि कुणाल दळवी गुरुवारी दुपारच्या सुमारास खेळण्यासाठी बाहेर पडले. मात्र सायंकाळ झाल्यावरही मुलं घरी परत न आल्यानं अफरोज यांच्या वडिलांनी शोध सुरू केला. सर्वत्र तपास घेऊनही मुलं सापडत नसल्यानं त्यांनी बनकरवाडी तलावाकडं धाव घेतली. त्यावेळी मुलं पाण्यात पडल्याचा त्यांना संशय आला. स्थानिक नागरिकांनी लगेचच ही बाब पोलिसांना कळवली. तसंच अग्निशमन दलाच्या जवानांना देखील बोलवण्यात आलं. जवानांनी शोध कार्य सुरु करत रात्री उशिरा चौघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेनं वाळूज परिसरात मात्र शोककळा पसरलीय.