गंगापूर (औरंगाबाद) -खरीप हंगाम २०२०-२१ मधील अतिवृष्टीने संपूर्ण पिके उध्वस्त होऊनही गंगापूर खुलताबाद तालुक्यातील (तालुक्यातील ५३ गावांसह) शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा हेतू परस्पर वगळल्याने पीक विमा मंजूर होईपर्यंत 8 जूनपासून गंगापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी दिला आहे.
कृषी मंत्री दादाजी भुसे यांना दिले निवेदन -
कृषी मंत्री दादाजी भुसे व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२०-२१ या वर्षातील संपूर्ण जिल्ह्यासह गंगापूर – खुलताबाद तालुक्यात सुध्दा अतिवृष्टीने व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कपाशी, मक्का, सोयाबीन, बाजरी, मूग, भुईमुग, तुर, यासह फळबाग धारकाचे पूर्ण हातात आलेली पिके उध्वस्त झाली होती. म्हणून दि. ९ नोव्हेंबर २०२० च्या शासन निर्णयाव्दारे शासनाने अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकरी नागरीकांना मदत देण्याबाबत शासन निर्णय जारी केले. त्या आधारे मा. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दि. १०/११/२०२० रोजी गंगापूर तालुक्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना तातडींची मदत म्हणून गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना २७ कोटी २८ लक्ष ६२ हजार २५० रु. तर खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ कोटी २० लक्ष ३० हजार ६७२ रु. वाटप केले. असे असताना म्हणजेच शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान मान्य करुनही २०२०-२१ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी आपले सोने नाणे गहान ठेऊन भरलेला पिक विमा का वगळला असा प्रश्न अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.