औरंगाबाद- जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून शिवसेनेतील गटबाजी समोर आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचेच नेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे. 'कोण अंबादास दानवे? तो काय माझ्या पेक्षा वरिष्ठ आहे का? त्याचे नाव घेऊन तोंड खराब करत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रस्थापितांना जनता कंटाळली आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत चमत्कार होईल आणि शेतकरी सहकार बँक विकास पॅनल निवडून येईल', असे विधान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे पत्रकार परिषदेत केले आहे.
बागडेंनी आता निवृत्ती घ्यावी-
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी शेतकरी सहकारी बँक विकास पॅनलतर्फे गुरुवारी (१८) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शेतकरी सहकारी बँक विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे. खैरे म्हणाले, आमदार हरिभाऊ बागडे यांना जिल्ह्यातील बँक, संस्था, कारखाने सर्व काही पाहिजे. मात्र हरिभाऊ यांचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता थांबावे. भारतीय जनता पक्षाच्या नियमानुसार ७० व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.