औरंगाबाद -माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे आज(बुधवारी) निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. आज सायंकाळी ४ वाजता दहेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामकृष्णबाबा यांना सहा दिवसांपासून मधुमेहाचा त्रास वाढल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे निधन - रामकृष्णबाबा पाटील निधन न्यूज
सलग १० वर्षे वैजापूरचे आमदार राहिलेले आणि औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. गेल्या सहा दिवसांपासून मधुमेहाचा त्रास वाढल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
१९७०मध्ये वैजापूर तालुक्यातील दहेगावच्या सरपंचपदापासून रामकृष्णबाबा यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९८५ला ते वैजापूरचे आमदार झाले. १९९५पर्यंत म्हणजे सलग दहा वर्षे ते वैजापूरचे आमदार राहिले. १९९९मध्ये ते काँग्रेसच्या उमेदवारीवर औरंगाबादचे खासदार झाले होते.
तब्बल २५ वर्षे ते औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिले. मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी पाच वर्षे काम केले. शेती विषयातील उत्तम ज्ञान असणारा नेता म्हणून रामकृष्णबाबांची ओळख होती. १९९४मध्ये कॅलिफोर्नियात जाऊन त्यांनी शेती तंत्रज्ञानातील बदल जाणून घेतले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी थेट संपर्क साधणारे नेते, अशी त्यांची राजकारणात ओळख होती.