औरंगाबाद -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिगरशेती मतदारसंघातील पाच जागा निर्णायक ठरणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.१४) उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. भुमरे, सत्तार, बागडे यांच्या पॅनलला कपबशी तर, डॉ. काळे, झांबड यांच्या काँग्रेस पॅनलला छत्रीचे चिन्ह देण्यात आले आहे. इतर अपक्ष उमेदवार विमान, छताचा पंखा, पतंग, मेणबत्ती या चिन्हांवर नशीब आजमावणार आहेत.
५० ते ६० मते घेणारे उमेदवार विजयी होण्याची शक्यता -
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या २१ मार्चला तर, २२ मार्चला मतमोजणी होणार आहे. २२ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. बिगरशेती मतदारसंघात विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, अभिजित देशमुख यांचा सामना जगन्नाथ काळे, रवींद्र काळे, रंगनाथ काेलते, जे.के.जाधव आणि दिलीप बनकर यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात पाच जागा आणि ३३५ मतदार असल्याने किमान ५० ते ६० मते घेणारे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज आहे.