औरंगाबाद- ऑटोमोबाईलच्या दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर परिसरातील हिंदू राष्ट्र चौकात घडली. शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आगीच्या विळख्यात सापडलेल्या दुकानाचे दृश्य मनोज सुदाम सूर्यवंशी (न्यू शांतिनिकेतन कॉलोनी, औरंगाबाद) यांचे पुडलीक नगर परिसरातील हिंदुराष्ट्र चोक येथे मनोज ऑटोमोबाईल नावाने दुकान आहे. आज सकाळी या बंद दुकानाला अचानक आग लागली. सुरुवातीला किरकोळ आग असल्याने शेजारील दुकानदारांनी सूर्यवंशी यांना आगीची माहिती दिली व अग्निशमन दलालाही बोलावून घेतले. मात्र, सूर्यवंशी घरातून दुकानात पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण दुकानाला विळख्यात घेतले होते.
त्या दरम्यान औरंगाबाद अग्निशमन दलाच्या सिडको विभागातील दोन बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. घटनास्थळी पुंडलिकनगर पोलिसांचे पथक देखील दाखल झाले होते. दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीमध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. नुकसानीचा आकडा १० ते १२ लाखाच्या घरात असण्याची शक्यता सूर्यवंशी यांनी वर्तविली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा-'डायमंड कप इंडिया-2019' बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मराठमोळ्या हर्षदाने पटकावले सुवर्णपदक