औरंगाबाद - गंगापूर तालुक्यातील तळपिंप्री शिवारात ऊसाच्या शेताला आग लागली. या आगीत आठ एकर ऊस जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गट क्रमांक 139 मध्ये शनिवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत शेतकरी अंबादास सुकासे, रामेश्वर सुकासे, संदीप बाबासाहेब सुकासे यांचा आठ एकर ऊस जळाला. आगीची मोठी घटना घडूनही पंचनाम्यासाठी महसूल विभागाकडून कोणीच आले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आठ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान - तळपिंप्री ऊस आग न्यूज
औरंगाबादमधील तळपिंप्री शिवारात शेताला आग लागून आठ एकर ऊस जळून खाक झाला. ऊसाला आग कशी लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
शेतकऱ्यांनी आग विझवल्याने लगतचे ऊस क्षेत्र वाचले -
सुकासे यांच्या शेतात मुक्तेश्वर साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होती. ऊस तोडणीकरून कामगार कारखान्यावर गेले असता दुपारी अचानक ऊसाला आग लागली. या आगीने काही काळातच रौद्र रूप धारण केले. स्थानिक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व रोटावेटर मारल्याने पुढील 25 ते 30 एकर ऊस जळण्यापासून बचावला. मात्र, ऊस जळालेल्या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे यांच्यासह शेतकऱ्यांनी मुक्तेश्वर साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी नंदकुमार कुंजर यांची भेट घेऊन तातडीने ऊस तोडणी करावी, अशी मागणी केली.