छत्रपती संभाजीनगरFasting For Virat Kohli: भारताला क्रिकेटवेडा देश म्हटलं जातं, हे अगदी खरं आहे. आपल्या देशात असे अनेक चाहते आहेत, जे त्यांच्या आवडत्या खेळाडूसाठी काहीही करायला मागेपुढे पाहात नाहीत.
विराट कोहलीसाठी उपवास धरला : क्रिकेटची अशीच एक चाहती छत्रपती संभाजीनगरात राहते. तिनं टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली चांगला खेळावा यासाठी चक्क उपवास धरला आहे! विशेष म्हणजे सुरुवातीला या मुलीनं तिच्या कुटुंबीयांनाही याबाबत काहीच कल्पना दिली नव्हती. साक्षी काळे असं तिचं नाव असून ती अकरावीत आहे. विराट कोहलीचा ५० एकदिवसीय शतकांचा टप्पा पूर्ण होईपर्यंत उपवास करणार असल्याचं साक्षीनं सांगितलं.
कुटुंबियांना सांगितलं नाही : विराट कोहली हा साक्षीचा आवडता खेळाडू आहे. या विश्वचषकात त्यानं चांगली कामगिरी करावी यासाठी तिनं दर मंगळवारी उपवास करायला सुरुवात केली. सुरुवातीला तर साक्षीनं उपवास करत असल्याचं आपल्या कुटुंबियांना सांगितलं नाही. मात्र एका मंगळवारी तिनं काहीच खाल्लं नाही. त्यानंतर घरच्यांनी तिची विचारपूस केली असता, तिनं विराट कोहलीसाठी उपवास करत असल्याचं सांगितलं. हे ऐकून कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांनी साक्षीला असं न करण्याबाबत वारंवार समजावलं, मात्र क्रिकेटवेड्या साक्षीनं त्यांचं काहीच ऐकलं नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली.
५० शतकांचा विक्रम गाठेपर्यंत उपवास करणार : विराट कोहलीची या विश्वचषकातील कामगिरी चांगली आहे. मात्र अजूनही त्यानं ५० शतकांचा विक्रम गाठला नाही. यासाठी आता साक्षीनं दररोज उपवास धरायला सुरुवात केली आहे. आता ती विराट कोहलीसाठी रोज केवळ एक वेळ अन्नाचं सेवन करते. जोपर्यंत विराट कोहली ५० शतकांचा विक्रम करत नाही, तोपर्यंत मी रोज उपवास करत राहणार असल्याचं तिनं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे आता कोहलीनं लवकरात लवकर ५० वं शतक पूर्ण करून साक्षीचा उपवास सोडवावा, अशी इच्छा साक्षीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोहलीच नंबर १! बनला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू