औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जशी इतर कारणे जबाबदार आहेत, तितकीच निकृष्ट खते, बी-बियाणे आणि आणि कीटकनाशकही जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येची वेगळी बाजू समोर आली आहे.
धक्कादायक खुलासा: शेतकरी आत्महत्येस खते, बी-बियाणे कंपनी जबाबदार हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी भ्रमनिरास करणारी, सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन - रघुनाथ पाटील
महाराष्ट्रात गेल्या दशकात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. याची कारणे म्हणजे, दुष्काळ, कमी उत्पादकता, निकृष्ट खतांचा आणि बी-बियाण्यांचा वापर आहे. 2014 च्या केंद्रीय गुन्हे अहवालात सांगितल्याप्रमाणे 20.6 टक्के शेतकरी हे कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या करतात, तर 16.8 टक्के शेतकरी हे पीक वाया जाण्यामुळे आणि कमी उत्पादकतेमुळे आत्महत्या करत असल्याची माहिती आयुक्त केंद्रेकर यांनी शपथपत्रात दिली आहे.
शेतकरी आत्महत्यांसाठी निकृष्ट खते व बियाणेही जबाबदार असल्याची माहिती मराठवाडा विभागीय आयुक्तांचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात दिल्याने खत कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही दिवसात मराठवाडा विभागात निकृष्ट खते, बी-बियाणे आणि किटकनाशकांच्या विरोधात विभागीय आयुक्तांच्या आदेशाने धडक कारवाई सुरू करण्यात आली होती. या काळात औरंगाबाद आणि लातूर विभागात 56 कारवाया करत गुन्हे दाखल करण्यात आले. याविरोधात 'महाराष्ट्र दाणेदार मिश्र खते उत्पादक असोसिएशन' या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत खते हा विषय कृषी खात्याचा असताना महसूल विभागाने कारवाई कशी केली? असा सवाल याचिकेत उपस्थित केला होता. याचेच उत्तर देत शेतकरी आत्महत्यांना निकृष्ट मिश्र खते, बी-बियाणे आणि आणि कीटकनाशकेही जबाबदार असल्याच प्रतिज्ञापत्र विभागीय आयुक्तांनी आकडेवारीसह सादर केले आहे. त्यामुळे महसूल विभागानेही कारवाईत भाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले. यातून मिश्र खत कपन्यांचे धाबे दणाणले आहेत. केंद्रेकर यांनी शपथपत्र दाखल करताच या खत कंपन्यांनी याचिका मागे घेतली आहे. मात्र, यातून शेतकरी आत्महत्येसाठी जबाबदार असणारा एक महत्वाचा घटक पुढे आला आहे.
मराठवाड्यात जानेवारी 2001 ते जुलै 2019 या काळात 7330 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरासरी काढली तर वर्षाला 408 शेतकरी आपले जीवन संपवत असल्याचे पुढे आले आहे. याचाच अर्थ 2001 पासून आकडेवारी पाहता प्रत्येक वर्षी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे. पीक खराब होणे आणि पुरेसे पीक न येणे यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होतोय. सरकारी दस्तावेजातच नोंद असल्याप्रमाणे कमी पीक येणे आणि पीक खराब होणे याच मुख्य कारण निकृष्ट बी-बियाणे, निकृष्ट मिश्र खतं आणि निरुपयोगी कीटकनाशकही आहेत. हा गुन्हा समाजातील सगळ्यात गरीब घटकाविरोधात होत आहे, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गेल्या काही दिवसात खतांच्या तपासणीबाबत कारवाई झाल्या आहेत. त्यात काही कंपन्यांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या निकृष्ट मिश्र खतांचा वापर केल्याने पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्याने काळजी घ्यावी याची माहितीही कृषी अधिकाऱयाने दिली आहे.
हेही वाचा - 'कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या बिर्याणीसारखी'