महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्वारीचा हुरडा विकून होतेय लाखोंची कमाई, चटकदार हुरड्यानं बदलतंय शेतकऱ्यांचं अर्थकारण - कोट्यावधीची कमाई

अल्प प्रमाणात झालेला पाऊस दुष्काळ सदृश्य परिस्थितीत पिकांचा भरोसा नाही. असं असतानाही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ज्वारीचा हुरडा हब म्हणून ओळख असणारी गावं भरपूर कमाई करत आहेत. पाहा व्हिडिओ.

Hurda selling
ज्वारीचा हुरडा

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 6:55 PM IST

Updated : Nov 24, 2023, 10:23 PM IST

हुरडा विकून होतेय कोट्यवधींची कमाई

गंगापूर( छत्रपती संभाजीनगर) : कमी पाण्यात कमी कालावधीत आणि कमी खर्चात येणाऱ्या ज्वारी पिकानं छत्रपती संभाजीनगरातील शेतकऱ्यांचं अर्थकारणच बदलून टाकलंय. ज्वारीची कोवळी लुसलुशीत दिसणारी दाणेदार कणसं. हातावर कणीस मळल्यानंतर त्या कणसातून पडणारे हिरवेगार दाणे. या ठिकाणी सुरू असलेल्या हुरडा पार्ट्या. छत्रपती संभाजी नगर पुणे महामार्गावर भेंडाळा फाटा ते दहेगाव बंगला ठिकठिकाणी असलेले हुरड्याचे शेकडो स्टॉल. हुरडा विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आणि हुरड्याच्या अर्थकारणातून होणारी लाखोंची उलाढाल असं चित्र गंगापूर तालुक्यातील नरसापूर, सारंगपूर, दहेगाव मुरमी परिसरात दिसू लागलं आहे.

दुष्काळी परिस्थितीतही शेतकरी कमावतायेत लाखो रुपये: दुष्काळी परिस्थितीत हुरडा विक्री शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण झाला आहे. गंगापूर तालुक्यातील नोव्हेंबर मध्येच काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून दुसरीकडे अल्प प्रमाणात झालेल्या पावसावर हुरडा हब म्हणून ओळख असणाऱ्या गावात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने शेकडो हेक्टर ज्वारी पेरणी केली. याच हुरड्याची भुरळ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडली आहे. दिवसेंदिवस पर्जन्यमानातील घट, ग्रामीण रोजगाराचा प्रश्न, आर्थिक अडचणीमुळे शेती समस्या तीव्र होत असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना पाण्याची कुठलीही शाश्वत व्यवस्था नसताना नरसापूर-सारंगपूर, मुरमी, दहेगाव या गावातील शेतकऱ्यांनी मात्र दुष्काळी परिस्थितीशी डगमगून न जाता मेहनत आणि कल्पकतेच्या जोरावर हुरड्याची मार्केटिंग करत लाखो रुपयांची उलाढाल करत आहे.

हुरड्याच्या विक्रीतून स्वयंरोजगार :छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर भेंडाळा ते चिकठाण फाटा दरम्यान शेतकरी सुरती हुरडा विक्रीचे शेकडो स्टॉल्स लावून हुरडा विक्री करत आहेत. यातून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून स्वयंरोजगार निर्माण झाला आहे. ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून हुरडा विक्रीचं प्रमाण वाढत असून व्यापारी साखळीला फाटा देत शेतकरी ते ग्राहक अशी साखळी असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांनाही चांगला होत आहे. एका स्टॉलवर प्रत्येक दिवशी दोन ते तीन हजार रुपयांची हुरडा विक्री होत असल्याने गावात प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसे येत आहेत. बदलत्या ऋतुचक्रामुळे पारंपरिक पद्धतीनं शेती करणंच अवघड झालं आहे. त्यामुळे होतकरू शेतकरी नवे मार्ग शोधत आहेत. हुरड्यावर संशोधन होणं गरजेचं असल्याचं मत युवा शेतकरी राहुल सुराशे ,आप्पासाहेब पारदे यांनी व्यक्त केलं आहे.

हुरडा हब ओळख असणारी ही गावे : सारंगपूर, नरसापूर दहेगाव बंगला, मुरमी, गोरेगाव, माळवाडी, पदमपूर या परिसरात गूळ भेंडी शाळूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. स्थानिक बाजारपेठेबरोबर परराज्यातही हुरड्याला मोठी मागणी आहे. तसंच परदेशातून या हुरड्याला मागणी येत असते, असंही येथील शेतकऱ्यांनी सांगितलं.


हेही वाचा :

  1. ऐन हिवाळ्यात मराठवाड्यातील पाणीप्रश्न पेटला, हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं 'रास्ता रोको' आंदोलन
  2. जगात भारत आपलं ध्येय पूर्ण करतो, बाकीचे फक्त गप्पा मारतात - मोहन भागवत
  3. शंभर वर्षांत भारतापुढे ऊर्जा निर्मितीचं आव्हान, देशाला जास्त प्रयत्नांची गरज - शास्त्रज्ञ पी रामाराव
Last Updated : Nov 24, 2023, 10:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details