औरंगाबाद- मराठवाड्यात सततच्या पडणाऱ्या दुष्काळाने शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे. तर अनेकांच्या फळबागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळबागेवर कुऱ्हाड देखील चालवली आहे. मात्र, औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिद्दीने टँकरच्या पाण्यावर आपली फळबाग जगवली आहे. येणुनाना थोरात, असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
ऐन दुष्काळात टँकरच्या पाण्यावर फुलवली पैठणच्या शेतकऱ्याने मोसंबीची बाग येणुनाना यांनी पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे आपल्या अडीच एकर शेतातील मोसंबीची बाग वाचवण्यासाठी तब्बल 80 हजाराचे पाणी विकत घेतले आहे. तर त्यांनी उन्हाळ्यातील 4 महिने टँकरने आपल्या मोसंबीच्या बागेला पाणी दिले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात मोसंबीने तग धरला.
पैठण तालुका म्हटल की, सर्वांच्या डोळ्यासमोर पटकन जायकवाडी धरण येते. मात्र, धरण उशाशी आणि कोरड घशाशी, अशी अवस्था पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.
थोरात यांच्या अडीच एकरवरील मोसंबीच्या बागेत 400 झाडे आहेत. गेली 3 वर्षे बाग जपल्यानंतर मागील वर्षी चांगली मोसंबी हाताला लागेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, झाडाला मोसंबी लागली आणि त्याच काळात पावसाने दडी दिल्याने मोसंबी वाचवणे अवघड झाले. झाडाला लागलेली मोसंबी तशीच ठेवली तर झाड देखील जळून जातील म्हणून मोसंबी लहान असतानाच ती थोरात यांनी काढून टाकली. त्यामुळे मोसंबीच्या झाडांना पाणी कमी लागू लागले. झाडे जगातील, असे वाटत होते. मात्र, पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणी आटल, विहीर कोरडी पडली.
मोसंबीची झाडे जगवली नाही, तर 3 वर्षांची मेहनत वाया जाईल, या भीतीने झाडे जगवण्यासाठी येणुनाना यांनी झाडांना टँकरने पाणी देण्याचे ठरवले. नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन त्यांनी 4 महिन्यात 80 हजाराचे पाणी आपल्या मोसंबीच्या झाडांना दिले. आज झाडे जिवंत आहेत. मात्र, अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. लवकरात लवकर चांगला पाऊस आला तर टँकरच्या पाण्याची गरज पडणार नाही. शिवाय झाडांना चांगली फळधारणा होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.