औरंगाबाद - कोरोनाच्या संकट काळात वैद्यकीय शास्त्रक्रियांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. शस्त्रक्रिया करताना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने अनेक रुग्णांनी आपल्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. त्यात कुटुंब नियोजनाच्या शास्त्रक्रियांमध्ये कमालीची घट झाल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद विभागात असलेल्या चार जिल्ह्यांमध्ये दरवर्षी उद्दिष्टांच्या 58 टक्के इतक्या शस्त्रक्रिया होत असतात. मात्र यावर्षी हा दर 8 टक्के इतका खाली आला आहे. पुढील दीड वर्ष शस्त्रक्रियांचा दर खालावलेला असेल, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. यावर मात्र आरोग्य उप संचालक यांनी याबाबत बोलण्यास मात्र नकार दिला. याबाबत मुलाखत देण्याचा अधिकार नसल्याचे आरोग्य अधिकारी स्वप्नील लाळे यांनी सांगितले.
मागील वर्षी पेक्षा 90 टक्क्यांनी कमी शस्त्रक्रिया-
एप्रिल 2019 ते 2020 या आर्थिक वर्षात औरंगाबाद विभागातील येणाऱ्या औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये 49 हजार 061 इतक्या शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट होते. प्रत्यक्षात मात्र 28 हजार 294 इतक्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या. ज्यात औरंगाबाद जिल्ह्याचे उद्दीष्ट 18 हजार 911 असताना 10 हजार 875 शस्त्रक्रिया झाल्या. जालना जिल्ह्यात 11 हजार 372 शस्त्रक्रियांचे उद्दीष्ठ असताना 6 हजार 486 शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात 10 हजार 271 उद्दीष्ठ असताना 5887 शस्त्रक्रिया झाल्या, तर हिंगोली 8507 इतके उद्दीष्ठ असताना 5051 शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. विभागातील एकूण उद्दीष्ठ 49 हजार 061 इतके असताना 28 हजार 294 इतक्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. एकूण उद्दिष्टाच्या 58% टक्के इतक्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. मात्र कोरोनाचे संकट आल्यावर शस्त्रक्रियांमध्ये घट झाली असून ही घट 92 टक्के इतकी आहे.
एप्रिल 2020 ते ऑक्टोबर 2020 पर्यंत 4% शस्त्रक्रिया -
मागील वर्षी उद्दिष्टाच्या 58 टक्के शस्त्रक्रिया झाल्या असताना यावर्षी हा दर अवघा 4 टक्के इतका आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात 921, जालना जिल्ह्यात - 447, परभणी जिल्ह्यात 366 तर हिंगोली जिल्ह्यात 243 कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. कोरोनामुळे शस्त्रक्रिया करताना रुग्णांमध्ये असणाऱ्या भीतीमुळे हा परिणाम झाला आहे. प्राप्त झालेली माहिती शासकीय रुग्णालयांची असून खासगी रुग्णालयातील माहिती यामध्ये नसली तरी त्यातही काही फरक नसल्याचे देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
इतर शस्त्रक्रियांवर मोठा परिणाम-
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांवर जसा परिणाम झाला, तसाच परिणाम इतर शस्त्रक्रियांवर झाला आहे. विशेषतः हृदय विकाराच्या शस्त्रक्रिया आणि हाडांवर होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक असणाऱ्या शस्त्रक्रिया रुग्ण करून घेत आहेत. मात्र काहीकाळ पुढे ढकलणे शक्य असलेल्या शस्त्रक्रिया रुग्णांकडूनच पुढे ढकलल्या जात असून कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यावर या शस्त्रक्रिया करण्याचा मानस अनेक रुग्णांनी व्यक्त केला. त्यामुळे मार्च महिन्यानंतर शस्त्रक्रिया सुरळीत होतील, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे यावर्षी वार्षिक उद्दीष्ठ गाठणे अवघड असल्याच मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.