औरंगाबाद - कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी समोर येताना दिसून आले आहेत. गंगापूर मतदार संघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या काही मित्रांच्या मदतीने कोविड रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक सेवांसह हवेतून ऑक्सिजन रुग्णांना देता येईल अशी यंत्रणा उभी केली आहे.
आमदार प्रशांत बंब यांनी उभारले सुसज्ज कोविड सेंटर शंभर खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर -
लासुर गावात जैन मंगल कार्यालयात तीन मजली शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. यामध्ये 24 आयसीयु बेड तर उर्वरित ऑक्सिजन बेड उभारण्यात आले आहेत. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सुविधा मिळावी याकरता तज्ञ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे. लासुर आणि परिसरातील नागरिकांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.
हवेतून ऑक्सिजन घेण्याची सुविधा -
राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा अनेक ठिकाणी जाणवत आहे. त्यामुळे कोविड सेंटर सुरू करत असताना रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध राहावा याकरता हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. इतकंच नाही तर काही ऑक्सिजन सिलेंडरदेखील सज्ज ठेवण्यात आले, असल्याची माहिती प्रशांत बंब यांनी दिली.
वेळ पडल्यास औषधी देखील उपलब्ध होणार -
कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार आहे. रुग्णांना औषध, जेवण देण्यात येणार आहे. अत्यावश्यक गरज पडल्यास रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून रुग्णांची माहिती दिल्यावर इंजेक्शन उपलब्ध होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य उपचार देणे शक्य होईल, असा विश्वास आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केला.