औरंगाबाद -अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात सहा विषय राहिल्याने परीक्षेच्या तणावात असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय सोमनाथ माने(वय 22,रा.ताडसोना, बीड), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
मृत अक्षय हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत होता. शेवटच्या वर्षात त्याचे सहा विषय राहिले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता. पाच ते सहा दिवसांपूर्वी तो शहरातच वास्तव्यास असेलेल्या चुलत भाऊ जयदीप माने यांच्याकडे रहायला आला होता. भाऊ जयदीप बुधवारी सकाळी नोकरीवर गेले असता, अक्षयने खोलीचा दरवाजा आतून बंद करून ठेवला होता. नोकरीवरून रात्री 8 वाजताच्या सुमारास जेव्हा जयदीप घरी आले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने जयदीप यांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडला असता, अक्षयने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.