औरंगाबाद - मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी स्वत: रस्त्यावर उतरून मंगळवारी शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या गुलमंडी आणि कुंभारवाडा भागातील अतिक्रमण हटवले. यावेळी पत्र्याचे शेड, अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने काढून रस्ता मोकळा करण्यात आला.
शहरातील पैठणगेट, गुलमंडी, कुंभारवाडा, रंगरगल्ली या परिसरात लागणाऱ्या हातगाड्यांमुळे व्यापारी त्रस्त होते. सर्व व्यापाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांना भेटून याबाबत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळीच मनपा आयुक्तांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासोबत मुख्य बाजारपेठेत फिरून पाहणी केली. पैठणगेट ते गुलमंडी आणि गुलमंडी, औषधी भवन मार्गे पैठणगेट हे मार्ग वन वे करावेत, अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी यावेळी केली.