छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : मुकुंदवाडी परिसरात रेल्वे रुळावर वायर पडल्याने दोन तास प्रवासी खोळंबले होते. रात्रीच्या सुमारास नंदिग्राम एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाकडे येत असताना विद्युतीकरणासाठी खांबावर लावलेली वायर रेल्वे इंजिनमधे अडकली. चालकाने प्रसंगावधान दाखवत रेल्वे थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. रात्री दहाच्या सुमारास आदिलाबादहुन मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस दोन ते अडीच तास मुकुंदवाडी परिसरात उभी राहिली. नांदेडहून निघालेली गाडीमध्येच अडकल्याने प्रवासी गाडीत अडून होते. तांत्रिक अडचण दूर झाल्यावर रेल्वे सुरू झाली.
नंदीग्राम अडकली रस्त्यात:अलिदाबाद येथून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस, रात्री दहाच्या सुमारास मुकुंदवाडी ते शिवाजीनगर दरम्यान अचानक थांबवावी लागली. विद्युतीकरणासाठी लावण्यात येणारी तार रेल्वेत इंजिनात अडकली असल्याचे पायलटच्या लक्षात आले, त्यामुळे त्याने गाडी थांबवली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना दुर्घटना स्थळी पाठवले. त्यावेळी तार रेल्वे खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आली. तातडीने ती तार काढण्याचे काम सुरू करण्यात आले, या प्रक्रियेला जवळपास दोन तासांचा अवधी लागला. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यातच अडकून पडावे लागले. तर काही प्रवासी जवळच स्टेशन असल्याने रेल्वे रुळावरून पायी मार्गस्थ झाले. याप्रकरणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी जास्त माहिती देणे टाळले. त्यामुळे रेल्वे नेमकी का थांबली असावी असा प्रश्न उपस्थित झाला.