औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवर युतीला यश मिळाले, तर औरंगाबादच्या एका जागेवर एमआयएमने विजय मिळवला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आघाडीला अपयश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात अस्तित्व 'टिकवण्याचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी कसे पेलणार हे पाहणे म्हत्वाचे असणार आहे. तसेच मराठावाड्यातील वर्चस्वासाठी भाजप-सेनेतही चढाओढ असणार आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राचे सिंहासन... कोणाला मिळणार जनतेचा आशिर्वाद?
मराठावाड्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत चढाओढ असणार आहे. मराठावाडा तसा शिवसेनेचा गड होता. पण या गडात भाजपने शिरकाव करून आपल्या मित्रावरच कुरघोडी केली. विदर्भातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा मानस आहे. शिवसेनेची मुंबईसह कोकणातून जास्त जागा जिंकण्याची रणनिती आहे. भाजपला रोखायचे असल्यास मराठवाड्यातच रोखले पाहिजे हे सेनेला माहित आहे. त्यामुळे त्यांचाही भर मराठवाड्यातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर असेल.
हेही वाचा - पवारांचे अचूक टायमिंग! ईडीची पीडा राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर?
मराठवाड्यात १ कोटी ४५ लाखांच्या जवळपास मतदार आहेत. हे मतदार मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांमधील सर्व पक्षीय उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला, तर मराठवाड्यात संख्या बलाबलवर निश्चितच युतीचे पारडे जड आहे. त्याप्रमाणे मराठवाड्यात सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या होत्या. दुसऱ्या स्थानी शिवसेना 11 जागा तर तिसऱ्या स्थानी काँग्रेसला 9 तर राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या होत्या.
2014 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. त्यात मोदी लाटेत सर्वच विरोधक साफ झाले. त्याचाच फायदा 2014 च्या विधानसभा निडणुकांमध्ये दिसून आला होता. यात मराठवाड्यातील सर्व जागांवर भाजप आणि शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सर्वाधिक जागा ह्या युतीच्या खात्यात जमा झाल्या होत्या. त्यावेळी मोदी लाट आणि मागील 3 टर्म अर्थात 15 वर्ष महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसलेल्या आघाडी सरकारवर जनतेचा नाराजीचा सूर निकालानंतर पाहायला मिळाला. तसा मराठवाडा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु 2014 च्या विधानसभेत युतीने या गडावर कबजा केला.
मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्य सरकारने अनेक मंत्रीपदे मराठवाड्याला दिली आहेत. त्यामुळे याचा फायदा युतीला होणार का हे पाहावे लागेल. दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ आणि त्यामुळे निर्माण झालेले शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे मागील पाच वर्षात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.
हेही वाचा - पवारांची पॉवर..! ईडी नरमली, म्हणाले तूर्तास चौकशीची गरज नाही
या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्नही गंभीर आहे. तसेच पाणी प्रश्न बिकट आहे. मराठवाड्यातील तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न अजूनही जैसे थे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय याठिकाणी प्रलंबित आहे. उद्योगांची स्थितीही म्हणावी तशी चांगली नाही. अनेक कारखाने बंद पडत आहेत. ग्रामीण भागात पाण्याचे प्रश्न गंभीर आहेच. मात्र, शहरी भागातही पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. नांदेडमध्ये तर नळाला पाणी येणे मुश्कील झाले आहे. याच पाण्यामुळे परळीमधील वीज प्रकल्प बंद पडला आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत जे गरजेचे असतानाही सुटलेले नाहीत. याचा फटका भाजप आणि एकंदरीत युतीला बसणार का हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
मागील काही महिन्यांपासून राज्यासह मराठवाड्यातही नेत्यांची भाजप आणि शिवसेनेत मेगाभारती सुरू आहे. यात जयदत्त क्षीरसागर, राणाजगजितसिंह पाटील, अब्दुल सत्तार या सारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. याचा फटका थेट काँग्रेस राष्ट्रवादीला बसू शकतो.
औरंगाबादचा विचार केला तर, येथे लोकसभेत एमआयएमचा खासदार निवडून आला आहे. शिवसेनेचे दिग्गज नेते असणारे चंद्रकांत खैरे यांना लोकसभेत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात एमआयएम आणि वंचित यांचा फॅक्टर महत्त्वाचा असण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात एके काळी पाच आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. मात्र आता स्थिती बदलली असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर यांनी युतीत प्रवेश केल्याने येथे राष्ट्रवादीला चांगलाच जोर लावाला लागणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचा बालोकिल्ला असणार बीड आता भाजपच्या ताब्यात आहे. बिकट परिस्थितीच्या काळात मराठवाड्याने शरद पवार यांना कायम साथ दिली असल्याचे स्वत: पवार सांगतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत मराठवाड्यातील जनता पवारांच्या पाठिशी उभी राहते का हे पाहणे महत्वाचे आहे.
नांदेड हा काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये येथे काँग्रेसला खिंडार पडलेले दिसत आहे. स्वत: अशोक चव्हाण यांना लोकसभेत पराभवाची धूळ चाखावी लागली होती. तसेच भोकर मतदारसंघामधून ते विधानसभेच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे. जालन्यातही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचे प्राबल्य आहे. तसेच राष्ट्रवादीचे राजेश टोपेदेखील सक्रिय आहे.
मराठवाड्यातील विधानसभा 2014 चे संख्या बलाबल -
- एकूण - 46
- भाजप - 15
- शिवसेना - 11
- काँग्रेस - 9
- राष्ट्रवादी - 8
- इतर - 3