सिल्लोड (औरंगाबाद) - शासन निर्णयानुसार अतिक्रमीत जमीन नावे करण्यासाठी वयोवृद्ध पती-पत्नीचे सोयगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शासन निर्णयानुसार अतिक्रमीत जमीन नावावर करण्याच्या मागणीसाठी सोयगाव तहसील कार्यालयासमोर गलवाडा येथील मागासवर्गीय समाजाचे वयोवृद्ध पती-पत्नी आमरण उपोषणास बसले आहेत. प्रशासनातर्फे या उपोषणाकर्त्यांची दखल घेतली नसल्याने जनतेत प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे.
गलवाडा ता. सोयगाव येथील मागासवर्गीय व वयोवृद्ध यशवंता सांडू गायकवाड व त्यांची पत्नी वत्सलबाई सांडू गायकवाड यांनी शासनाच्या पडित जमिनीवर १९७८ पासून अतिक्रमण करून शेती केली आहे. त्यांच्यावर शासनाने अतिक्रमण केल्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करून दंड आकारला. शासनाच्या परिपत्रकानुसार १९९० पूर्वीचे शासकीय जमिनीचे अतिक्रमीत जमिनीचे पट्टे कसणाऱ्याच्या नावावर करण्याचा आदेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी अतिक्रमीत जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी सिल्लोड उपविभागीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमचे कलम ५० व ५१ नुसार दि. ८/१२/२०११ ला आधिकार प्रदान केलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी दि. १/१/२०१२ पासून करण्याचे नमूद आहे. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाई व कामचुकारपणामुळे सर्व पुरावे उपलब्ध असतानाही गायकवाड कुटुंबाच्या नावे/अद्याप जमीन झालेली नाही.