औंरंगाबाद- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून वसूल करण्यात येणारा दंड आता एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे घेतला जाणार आहे. वाहतूक विभागाच्या कारभारामध्ये पारदर्शकता यावी आणि जमा केलेल्या दंडाबाबतचा तपशील साठवून रहावा यासाठी ई-चालान पद्धत मंगळवारपासून शहरात सुरू करण्यात येत आहे. यासाठी १०० मशीन शहर पोलिसांना दिल्या आहेत.
अनेक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. अशा वाहनचालकांकडून पावतीद्वारे दंड वसूल करण्यात येतो. तसेच वाहतूक विभागाच्या कार्यालयात जाऊनही दंडाची रक्कम भरता येते. दंड भरल्याची पावती दाखविल्यानंतर वाहतूक विभागाकडून गाडी सोडण्यात येते किंवा जप्त केलेले लायसन्स परत करण्यात येते. यामध्ये वाहनचालकांचा बराच वेळ वाया जातो. वाहनचालक आणि वाहतूक पोलीस यांच्यात यावरुन वादही होतात. त्यामुळे अनेक वेळा नियम मोडणाऱ्या व्यक्तींचा फोटो काढून दंडाची पावती वाहनचालकांच्या पत्त्यावर पाठविली जाते. हा दंड वाहन चालकाकडून बँकेत भरला जात होता. या जुन्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.