औरंगाबाद -सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक सहलीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि बसचालकांनी मद्यधुंद अवस्थेत दिवे आगार येथील समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एका स्थानिकाने कॅमेऱ्यात कैद केला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी शिक्षकांसह चालकांना पोलीस ठाण्यात नेऊन समज दिली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थिनींना पोलीस ठाण्यातच अर्धी रात्र काढावी लागली. विद्यार्थिनी घरी परतल्यानंतर संतप्त पालकांनी संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
सोयगाव जिल्हा परिषद शाळेची सहल महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळे पाहून 25 डिसेंबरला संध्याकाळी दिवे आगार येथील समुद्रकिनारा पाहण्यासाठी पोहोचली होती. विद्यार्थी समुद्र किनाऱ्यावर असताना मद्यधुंद मुख्याध्यापक आनंद इंगळे, शिक्षक ठाकूर, शिपाई जावळे यांनी मुलींना समुद्राच्या पाण्यात लोटले. त्यानंतर, त्यांनी मुला-मुलींची कुस्ती लावण्याचादेखील प्रयत्न केला. शिक्षकांच्या गैरवर्तवणुकीला घाबरून मुली बसकडे पळाल्या. हा सर्व प्रकार एका स्थानिकाने कॅमेऱ्यात कैद केला.