औरंगाबाद :जवाहर नगर परिसरातील मयूरबन कॉलनी येथील महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार उपनिरीक्षक अनिल बोरडले यांनी परिसरातील काही महिलांची दारूच्या नशेत छेड काढली. महिलांच्या घराच्या भिंतीवर तो बॉल मारून खेळत होता. त्यावेळी तिथे असलेल्या महिलांकडे अश्लील नजरेने पाहून त्यांना त्रास देत होता. काही महिलांनी त्याला अडवल्यावर अश्लील भाषेत त्यांच्याशी वर्तन केले. यानंतर काही महिला एकत्र आल्यावर सर्वच महिलांना त्रास देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी जवाहर नगर पोलिसात आपला मोर्चा वळवला, पोलिसावर कारवाई करा, यासाठी रात्री उशिरापर्यंत महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला.
उशिरा तक्रार दाखल :पोलीस उपनिरीक्षकाकडून केलेल्या गैरवर्तनानंतर महिलांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी महिलांची तक्रार घेतली, त्यावेळी आरोप असलेले अनिल बोडले तिथे आले. त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकाला व्हिडिओ कॉल करून महिलांना अश्लील भाषेत जाब विचारला, हा पोलिस अधिकारी शुद्धीवर नव्हता, हे त्या समोर आलेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे. जवाहर नगर पोलिसांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. मात्र पोलिसांकडूनच गैरवर्तन होत असल्याने सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.