छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Drug Stock Seized:अंमली पदार्थांचा काळा बाजार थांबवण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय संस्था कार्यरत असतात. त्यात सर्वांत मोठी संस्था म्हणजे महसूल गुप्तचर विभाग मानली जाते. देशात सुरू असलेल्या अवैध कामांवर लक्ष ठेऊन या विभागाकडून कारवाई केली जाते. त्यानंतर स्थानिक पातळीवर प्रतिबंध घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुप्तहेर शाखा, स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासन कार्यरत असतात. एकमेकांच्या साह्याने वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू असलेले औषधी कारखाने तपासणं, गैरप्रकार सुरू असल्यास कारवाई करणं असं काम या सगळ्या संस्थांनी करायला हवं. मात्र तसं होत नसल्याचं अनेक वेळा उघड झालं. एखाद्या भागात चुकीचं कृत्य घडत असेल तर त्याबाबत लक्ष ठेवण्याचं काम तपास यंत्रणा, गुप्तचर विभाग किंवा पोलीस यांचं आहे आणि काही ठिकाणी ते तत्परतेनं केलं जातं. अंमली पदार्थांचा साठा इतर शहरांमध्ये पाठवला जात असताना, स्थानिक पातळीवर कोणत्याच विभागाला याची माहिती नसावी हे धक्कादायक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेचा व्यापार चालतो कसा असा प्रश्न प्रशासकीय अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी उपस्थित केला.
अन्न व औषधी विभागाला नाही भनक:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात दोन आठवड्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये 400 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात पैठण तालुक्यातील दोन कंपन्यांचा समावेश आहे. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये अवैधरीत्या अंमली पदार्थ तयार करण्याचं काम सर्रास सुरू होतं. 1940 च्या कायद्यानुसार खरंतर औषधी कंपन्यांमध्ये कच्चामाल आणि पक्का माल याबाबत अन्न व औषधी प्रशासनाला माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या कंपनीत कोणत्या प्रकारचं केमिकल वापरल्या जातं, त्याचा उपयोग कशासाठी होतो, त्या कंपन्यांमधून कोणत्या प्रकारची औषधं निर्मिती केली जातात आणि ती कोणत्या शहरांमध्ये कोणाला पाठवली जातात यावर पूर्णतः लक्ष असणं गरजेचं आहे. मात्र, गुजरात मधून महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे आणि मुंबई या विभागांना सोबत घेऊन शहरात कारवाई करत असताना, याबाबत स्थानिक अन्न व औषधी प्रशासनाला माहिती नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे स्थानिक विभाग फक्त खवा आणि मावा यांच्यावरच कारवाई करण्यात व्यस्त आहे का? असा प्रश्न विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थितीत केला.