औरंगाबाद - मुंबईमधून अमली पदार्थ आणून औरंगाबाद शहरात विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचत आज रेल्वे स्टेशनरोड येथे अटक केली. विशेष म्हणजे आरोपींकडे एका माजी नगरसेवकाची गाडी मिळाली आहे. अशिफ अली मुश्ताक कुरेशी (वय ४१, रा. कुर्ला मुंबई), नुरोद्दीन बद्रोद्दिन सय्यद (वय ४१, रा. बांद्रा मुंबई) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १३ ग्राम एमडी नावाचा अमली पदार्थ, २८ ग्राम चरस जप्त करण्यात आले आहेत.
मुंबईच्या अमली पदार्थ विकणाऱ्यांना औरंगाबादमध्ये अटक; माजी नगरसेवकाची गाडी जप्त - Aurangabad police news
मुंबईमधून अमली पदार्थ आणून औरंगाबाद शहरात विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचत आज रेल्वे स्टेशनरोड येथे अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन परिसरात मुंबईवरून काही लोक अमली पदार्थ विक्री करण्यासाठी शहरात घेऊन येत आहेत. त्यानुसार सकाळी अकराच्या दरम्यान स्थानिक पोलीस स्टेशनसह, झोन १चे अधिकारी-कर्मचारी यांनी सापळा रचला. मिळालेल्या माहितीप्रमाणे काळ्या रंगाची स्कोर्पिओ गाडी पावणे बाराच्या दरम्यान पंचवटी चौकात आली. त्यावेळी पोलिसांनी गाडीला अडवले. गाडीमध्ये अशिफ अली मुश्ताक कुरेशी, नुरोद्दीन बद्रोद्दिन सय्यद हे दोघे बसलेले होते. त्यांना सुरुवातीला विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
आधीपासूनच माहिती असल्यामुळे पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, प्रवासी बागेत पोलिसांना १३ ग्राम एमडी नावाचा अमली पदार्थ, २८ ग्राम चरस मिळाले आहे. तसेच गाडीबद्दल विचारणा केली असता, ही गाडी माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांची असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.