महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेमध्ये रंगली चित्र प्रदर्शनाची हुरडा पार्टी; अपघातावर मात करत आश्विनीने आयुष्यात भरले रंग - चित्रकार अश्विनी साळवे

हुरडा पार्टी म्हणलं की रानमेव्याची मेजवानी ही आलीच, मात्र औरंगाबादेत हुरडा पार्टीत चक्क चित्रांची मेजवानी पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनातील सर्व चित्र अश्विनी साळवे या कला शिक्षिकेने काढले आहेत.

hurda party
औरंगाबादेत चित्रांच्या प्रदर्शनाची 'हुरडा पार्टी'

By

Published : Dec 27, 2019, 8:56 AM IST

औरंगाबाद- हुरडा पार्टी म्हणलं की रानमेव्याची मेजवानी ही आलीच, मात्र औरंगाबादेत हुरडा पार्टीत चक्क चित्रांची मेजवानी पाहायला मिळत आहे. ती देखील एका कलाकाराच्या मदतीसाठी. प्रदर्शनात लावलेले हे चित्र वृद्धांपासून ते लहानमुलांपर्यंत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या प्रदर्शनातील सर्व चित्र अश्विनी साळवे या कला शिक्षिकेने काढले आहेत.

औरंगाबादेत चित्रांच्या प्रदर्शनाची 'हुरडा पार्टी'

हेही वाचा -ग्रहण ग्रहण सूर्यग्रहण..! विद्यार्थ्यांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

एका अपघातात अश्विनी बचावली होती. कारच्या भीषण अपघातात तिची बहीण, भाऊजी आणि त्यांची मुलांचा मृत्यू झाला. या अपघातात तिचं कुटुंब हरवलं, अपघातात अश्विनीच्या हाताची दोन बोट निकामी झाली. मात्र, हातातील कलेने तिला नवीन जीवन दिले. हाताच्या तीन बोटांनी तिने शंभरांहून अधिक चित्र रेखाटली. कुलस्वामिनी प्रतिष्ठानने तिच्या चित्रांचं प्रदर्शन हुरडा पार्टीत लावून अश्विनीसाठी आर्थिक मदत उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

हुरडा पार्टी म्हणलं की गरम गरम हुरडा, बोर, पेरू यासारख्या रानमेव्याची मेजवानी हमखास मिळते. मात्र, औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे रानमेव्यासह विविध रंगछटा असलेल्या आकर्षक चित्रांची मेजवानी आलेल्या लोकांना अनुभवायला मिळत आहे. एका खास उद्देशाने हुरडा पार्टीत ही चित्र लावण्यात आली आहेत. तो उद्देश म्हणजे, एका कलाकाराला मदत करण्याचा. ही चित्र अश्विनी साळवे या कलाकाराचा उत्साह वाढवण्यासाठी लावण्यात आली आहेत.

हेही वाचा -अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाच्या कामात 'एजंटगिरी'चा सुळसुळाट

अश्विनी ही कला शिक्षक आहे. कागदावर विविध रंगछटा उमटवून चित्रात जीव ओतणाऱ्या अश्विनीच्या जीवनातले रंग मात्र नियतीने बेरंग केले. तीन वर्षांपूर्वी एका कार अपघातात तिची बहीण, भाऊजी आणि त्यांची मुलं काळाने हिरावून घेतली. अश्विनीचं नशीब म्हणून ती त्या अपघातात बचावली. मात्र, त्यात तिला दुखापत झाल्याने सहा महिने ती आपलं भान हरवून बसली होती. दीड वर्ष कुठलीही हालचाल करणं तिला शक्य नव्हतं. ज्या हातांच्या पाच बोटांनी चित्र रेखाटायची त्याच हाताची बोट ब्रश पकडत नव्हती. कारण तिचे दोन्ही हात निकामी झाली होती. हातांमध्ये ऑपरेशन करून रॉड टाकण्यात आले. आता हात कामे करतील याची शक्यता कमी होती. मात्र, तिने तोल सांभाळत हातात ब्रश पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाताची फक्त तीन बोट काम करू लागली. तरी जिद्द न हारता तिने तीन बोटांच्या मदतीने चित्र रेखाटत स्वतःला पुन्हा उभं केलं. चित्रकलेमुळेच मी स्वतःला सावरू शकले, अशी भावना अश्विनी साळवे यांनी व्यक्त केली.

अश्विनीला प्रेरणा मिळावी यासाठी औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. आज चित्र पाहण्यासाठी कोणीही कलादालनात जास्त जात नाही. मात्र, अश्विनीने त्या अवस्थेत काढलेली चित्र सर्वाना पाहता यावी यासाठी हुरडा पार्टीत चित्रांचं प्रदर्शन लावण्यात आले. अश्विनीच्या जिद्दीला प्रेरणा मिळावी आणि तिला मदत व्हावी म्हणून वेगळ्या पद्धतीने चित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. हुरडा पार्टीसाठी लोक आपल्या कुटुंबासह येतात त्यावेळी या चित्रातून अनेकांना देखील प्रेरणा मिळू शकते, यासाठी हा प्रयत्न केल्याचं कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे आयोजक विलास कोरडे यांनी सांगितलं. रोज दोनशे ते अडीचशे लोकं या चित्रांचं प्रदर्शन पाहून अश्विनीचं कौतूक करत आहेत. निश्चित या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अश्विनीला जगण्याची नवी उमेद मिळेल यात शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details