औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदावर कार्यरत आहेत. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी डॉ. प्रमोद येवले यांच्या नियुक्तीची घोषणा केली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून २०१९ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.