औरंगाबाद -सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा कोरोनाचा सामना करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण आपापल्यापरिने मदत करत आहे. काही ठिकाणी डॉक्टर रुग्णांना मोफत रुग्णसेवा देत आहेत. औरंगाबाद शहारात असलेले डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे आरोग्य केंद्र गरिबांसाठी फायदेशीर ठरत आहेत. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मिलिंदनगर भागातील गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र गरजू रुग्णांना अवघ्या 10 रुपयात उपचार देत आहे. एखाद्या रुग्णाकडे पैसे नसल्यास त्याला मोफत उपचार देत असल्याची माहिती, आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य सेवा देणारे डॉक्टर आणि रुग्णालयात रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या परिस्थितीत कोरोना होण्याचा अधिक धोका आहे. अशा आणीबाणीच्या स्थितीतही डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे आरोग्य केंद्र गोरगरिबांना अवघ्या दहा रुपयात उपचार देत आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाच्या हातावर सर्वप्रथम सॅनिटायझर लावण्यात येते. रुग्णांना रांगेत बसवताना सोशल डिस्टन्स पाळला जाते. रुग्णालयात कार्यरत असलेले सर्व कर्मचारी कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी घेत आहे.