औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ( Dr Babasaheb Ambedkar Marathwada University ) पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सलग 46 तासानंतर बुधवारी दि.30 रोजी संपली. पदवीधर गटातील सर्व दहाही जागांचे निकाल बुधवारी टप्प्याटप्प्याने जाहीर ( 10 Seats Results Declare In Graduate Group ) झाले. विजयी उमेदवारांना मा. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
विजयी झाल्याचे प्रमाणपत्र :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीसाठी 50.75 टक्के मतदान झाले होते. एकूण 36 हजार 254 मतदारांपैकी 18 हजार 400 पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात सोमवार, मंगळवारी व बुधवारी मतमोजणी झाली. मतमोजणीसाठी प्रत्येक शिफ्टला 40 प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण 120 जण नेमण्यात आले. अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.संजय सांभाळकर, डॉ.आनंद देशमुख हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या निवडणूकीत सुनील यादवराव मगरे, सुनील पुंडलिकराव निकम, राऊत सुभाष किशनराव, पूनम कैलास पाटील व दत्तात्रय सुंदरराव भांगे हे राखीव गटातून निवडणुन आले.