औरंगाबाद (गंगापूर) -गंगापूर महसूल प्रशासनाच्या गलथान कारभारविरुद्ध वाल्मिक शिरसाठ यांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदवला आहे. मागील पाच महिन्यांपासून रिक्त असलेले गंगापूर तहसीलदार या पदासह तालुक्यातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांचे रिक्त पदे तत्काळ भरावेत. तसेच, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे न केल्यास दहा दिवसानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मंत्रालयातील दालनात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक शिरसाठ यांनी यावेळी दिला आहे.
माहिती देताना, वाल्मिक शिरसाठ गंगापुरात प्रभारी राज, नागरिकांचे कामे खोळंबली
तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या निलंबनानंतर पाच महिन्यांपासून गंगापूरला कायमस्वरूपी तहसीलदार नाही, नगर परिषदेला मुख्याधिकारी नाही, सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षभरापासून उपअभियंता नाही, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख ही कार्यालये कनिष्ठ दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणून कारभार हाकत आहेत. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार, लिपिकांच्या जागा रिक्त असल्यामुळे येथे अडाणी कोतवाल लिपिकांचा कारभार सांभाळत आहे. संजगांधी योजनेचे तीन हजार पाचशे प्रकरणे केवळ तहसीलदार नसल्यामुळे प्रलंबित आहेत. तर, चालू लाभार्थ्यांना मागच्या दिवळीपासून पगार मिळालेला नाही. पालकमंत्री पाणंद रस्त्याची साडेपाचशे प्रकरणे प्रलंबित आहेत. जवळपास दोन हजार लोकांची रेशनकार्ड मागच्या दोन वर्षांपासून ऑनलाइन होत नसल्याने, त्यांना शासनाचा लाभ मिळत नाही. शिवना नदीला पूर येऊन आठ दिवस होऊन गेले. मात्र, प्रशासनाने अजूनही पूरग्रस्त भागाचे पंचनामे केले नाहीत. या विषयी तालुक्याचे आमदार, जिल्हाधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याचा थेट आरोपही शिरसाठ यांनी यावेळी केला आहे.
महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात विष प्राशन करण्याचा इशारा
प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेत तत्काळ गंगापूरला कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक करावी. अन्यथा, तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी येत्या दहा दिवसानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मंत्रालयातील दालनात विष प्राशन करून आत्महत्या करणार असल्याचा इशारा शिरसाठ यावेळी दिला आहे. यावेळी प्रामुख्याने अबेद सैय्यद, सुरेश दंडे, संदीप मैराळ, देविदास काळुंके, देवानंद मालकर, रुद्रा निचीत, संजय राऊत, चेतन सोमवंशी, समीर शेख, सौरभ आमराव, सागर शेजवळ, अमोल आलंजकर आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.