औरंगाबाद - निवडणूक लढवताना उमेदवाराला तीन अपत्ये असतील तर उमेदवारी अर्ज बाद होतो, असा नियम आहे. पण, या नियमात जन्म दिलेल्या अपत्यांची संख्या गृहीत धरण्यात आली होती. त्यातील एखादे अपत्य दगावले तर काय, याबद्दल स्पष्टता नव्हती. औरंगाबाद खंडपीठाने ही बाब स्पष्ट करणारा निकाल दिला असून, यापुढे हयात अपत्यांनाच गृहीत धरावे असे सांगितले आहे.
याचिकाकर्ते वकील विजयकुमार सपकाळ यासंबंधी नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी सविता आणि सुभाष गावीत यांनी याचिका दाखल केली होती. तीन अपत्यांचे कारण दाखवत नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. यामुळे या दाम्पत्याने न्यायालयात आव्हान दिले होते.
सुभाष गावीत यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये आहेत. तसेच दुसरी पत्नी सविता यांच्यापासून त्यांना तीन अपत्ये झाली. यातील तिसरे अपत्य २००२ मध्ये जन्मास येऊन २००३ मध्ये मरण पावले. तीन अपत्यांचा कायदा महाराष्ट्रात २००१ साली अस्तित्वात आला आहे. या कायद्यान्वये गावीत यांचा जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला.
हा उमेदवारी अर्ज भरतेवेळी गावीत यांचे २००२ नंतर जन्मलेले अपत्य हयात नव्हते. त्यामुळे हा नियम त्यांना लागू होत नाही असा दावा गावितांनी न्यायालयात केला. औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन निर्णय दिला. या निर्णयात खंडपीठाने स्पष्ट केले की उमेदवारी अर्ज भरतेवेळी अपत्यांची संख्या ग्रहीत धरावी. त्या दाम्पत्याला किती अपत्ये झाली हे ग्रहीत धरू नये.