औरंगाबाद - 'इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन'च्या वतीने १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान औरंगाबादमध्ये 'डायमंड कप इंडिया-२०१९' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील ३७ देशांतील ३५० खेळाडूंची नोंदणी झाली आहे.
औरंगाबादमध्ये डायमंड कप इंडिया आंतराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा हेही वाचा -'त्या' ऐतिहासिक कसोटीपूर्वी टीम इंडिया इंदोरमध्ये घेणार 'गुलाबी' प्रशिक्षण
या स्पर्धेसाठी ५० देश आणि ४५० हून अधिक खेळाडू येणार असल्याची माहिती 'इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन' व 'एशियन फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस'चे सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेला आयबीबीएफचे अध्यक्ष राफेल सॅंन्टोसा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवाय, शंभरहून अधिक पदाधिकारी यांच्यासह आंतरराष्ट्रीय पंचही उपस्थित राहणार आहेत.
ही शरीरसौष्ठव स्पर्धा १० वजनी गटात होईल. पुरुष क्लासिक, पुरुष फिजिक, महिला बिकनी, महिला फिटनेस इत्यादी स्पर्धा गटात होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसोबत इतर १० विविध खेळांच्या जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत. पंजा लढवा, बेंच प्रेस, लिफ्टींग, रस्सीखेच, कराटे, सायकलिंग, फॅशन शो, योगा, जुडो, स्केटींग, सायकलींग या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यासह शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना शरीरसौष्ठव स्पर्धेचे महत्व कळावे यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला बाहेर देशातील खेळाडू औरंगाबादमध्ये दाखल होतील.
या स्पर्धेसाठी विभागीय क्रीडा संकुलात १०० बाय ४० आणि ७ फुट उंच स्टेज बनविण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी ५० हजार प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती डॉ संजय मोरे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान औरंगाबाद मिळाला असला तरी प्रायोजकत्वासाठी कोणीही मदत केली नाही. अनेक उद्योजकांकडे गेलो त्यांनीही मदत केली नाही. स्वत: खर्च करून ही स्पर्धा भव्य-दिव्य स्वरुपात साजरी करणार आहे, असेही आयोजक डॉ. संजय मोरे यांनी सांगितले.