कामगारांच्या पेट्या पळवतांना नागरिक गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) :गंगापूर येथे शुक्रवारी ३० जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलजीवन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच शासकीय योजनेतील विविध लाभाच्या लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी तालुकाभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
लाभार्थ्यांचा गोंधळ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण संपताच स्टेजवरून खाली उतरताच या ठिकाणी लाभार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. कामगारांसाठी वाटप होणाऱ्या कामगार साहित्याच्या पेट्या दुसऱ्यांनीच पळवल्याने या ठिकाणी गोंधळ उडाला होता. या गोंधळाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पेट्यांची पळवापळवी : विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाच्या वाटपासाठी महिला-पुरुष एकत्र आले होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली. बांधकाम कामगारांसाठी शासकीय योजनेतून मिळणाऱ्या पेट्या घेण्यासाठी एकच धाव घेतली. दिसेल तो व्यक्ती पेट्या घेऊन पळत होता. त्यामुळे उडालेल्या गोंधळामुळे खरे लाभार्थी वंचित असल्याची चर्चा सुरू आहे. उडालेल्या गोंधळाने कार्यक्रमात नियोजनाचा अभाव असल्याचे देखील पाहायला मिळाले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी :कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, देशातील ८० कोटी नागरिकांना मोदी मोफत अन्नधान्य देतात. प्रधानमंत्री आवास योजना नावाच्या योजनेतून अकरा कोटी नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत घरे बांधून दिले. शंभर रुपयात नऊ कोटी नागरिकांना गॅस कनेक्शन दिले. ८० कोटी नागरिकांना विविध योजना दिल्याने २०२४ च्या निवडणुकीत ८० कोटी नागरिक मोदींना मतदान केल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे बिहारमधील पाटण्याला पंधरा पक्ष एकत्र आले. त्यात चर्चा काय झाली तर, लालूप्रसाद यादव म्हणतात राहुल जी तुम शादी करलो, मोदींना हटवण्याची बैठक होती की, राहुलच्या लग्नाची बैठक होती? पुढची बैठक शिमल्यात आहे. शिमल्याच्या बैठकीत राहुल गांधीचा साखरपुडा होणार की काय अशी टोलेबाजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. २०२४ ला भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहे. विरोधकांनी त्यांच्या उमेदवाराचे नाव सांगावे असा, सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
महिलांच्या हंडा मोर्चा ने पोलिसांची धावपळ :गंगापूर शहराला पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन देण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस शहरात येण्याअगोदरच पोलिसांनी या महिलांना थांबवून मागण्या समजून घेतल्या. गंगापूर शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. महिलांच्या हंडा मोर्चाने पोलिसांची मात्र, चांगलीच धावपळ झाली. आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अनेक महिलांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले होते. तहसीलदार सतीश सोनी, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
हेही वाचा -Anganwadi Servants March : विविध मागण्यांसाठी आयटक अंगणवाडी सेविकांचा गंगापूर तहसीलवर मोर्चा