औरंगाबाद- राज्यात अनेक ठिकाणी राजकीय मेळावे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सोबत घेऊन याबाबत कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लोक वापर मास्क वापरत नाही. त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल, हे सर्व गांभीर्याने घ्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांची प्रतिक्रिया शिवजयंतीच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये -
शिवजयंती साजरी करत असताना काही निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयावरदेखील विरोधक राजकारण करू पाहत आहेत. मात्र, लोकांचे जीव वाचवायचे आहेत. त्यासाठी बंधने महत्त्वाची आहेत. त्यामुळे यावर राजकारण करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी विरोधकांना केले.
अर्थसंकल्पात मराठवाड्याला वाढीव निधी -
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याला काही अंशी वाढीव निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. या बैठकीमध्ये हिंगोलीला 160 कोटी, उस्मानाबाद 280 कोटी, लातूर 275 कोटी, बीड 340 कोटी, नांदेड 355 कोटी, परभणी 225 कोटी, जालना 260 कोटी आणि औरंगाबाद 365 कोटींचा निधी या वर्षीच्या अर्थसंकल्पात देण्यात येणार आहे. तो निधी विकास कामांसाठी वापरला जावा हीच अपेक्षा आहे. तसेच हा जिल्हा वार्षिक योजनेचा निधी आहे. बाकी अनेक निधी अजूनही वेगळा मिळताे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
संभाजी पाटील यांच्या आरोपांवर प्रतिउत्तर -
भाजपच्या आमदार आणि माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी नियोजन बैठकीत कोणाचाही ऐकून घेतले जात नाही. मराठवाड्याला कमी निधी मिळू शकतो, असा आरोप केला होता. यावर अजित पवार यांनी सडेतोड उत्तर देत, स्वतःला संधी होती, तेव्हा काही करायचे नाही आणि दुसरे कोणी काही केले, तर त्यांना ढुसण्या मारायचा, असे हे काम आहे. उजनीच्या पाण्याबाबत यांनी काहीच केले नाही. आता बैठकीत प्रश्न उपस्थित करतात. केंद्राने 28 हजार कोटी दिले नाही. खासदारांचे पैसेही त्यांनी कापले. याचे उत्तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी द्यावे, असा शाब्दिक हल्ला अजित पवार यांनी केला. त्याचबरोबर केंद्राने पेट्रोल-डिझेल, डांबर, सिमेंट या सगळ्या गोष्टी महाग केल्या आहेत. राज्य कर कमी करणार का, याबाबत मी 8 मार्च रोजी भूमिका स्पष्ट करेल, असेही ते म्हणले.
हेही वाचा - चंद्रकांत दादा हा कसला पुरुषार्थ ? शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटलांचा घणाघात