कन्नड (औरंगाबाद) - आपल्या कर्तव्याच्या ठिकाणाहून गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे गुरुवारी सायंकाळी घडली. जितेंद्र लक्ष्मण सोनवणे (वय २९) असे या जवानाचे नाव आहे.
सुट्टीवर आलेल्या जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, कन्नड तालुक्याच्या निंभोरा येथील घटना - निंभोरा जवानाचा मृत्यू
गुरुवारी सायंकाळी शेतातील घरावरील उघड्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला, यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेल्या जितेंद्र सोनवणे यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निंभोरा येथील जवान जितेंद्र लक्ष्मण सोनवणे हे लष्करामध्ये सेवा बजावत होते. ते चार दिवसांपूर्वी गावी निंभोरा येथे आले होते. गावी आल्यानंतर त्यांनी शेतात स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. गुरुवारी सायंकाळी शेतातील घरावरील उघड्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेल्या जितेंद्र सोनवणे यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.
या जवानाचे करंजखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. शुक्रवारी निंभोरा येथे जितेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून स.पो.नि जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप कनकुटे अधिक तपास करीत आहेत.