औरंगाबाद- कुलरच्या पाण्यात खेळणी पडल्याने ती काढण्यासाठी गेलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना रोजाबाग परिसरात घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रेहान इस्तीयाक अन्सारी (वय - ५ वर्ष, रा. रोजाबाग, औरंगाबाद) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
औरंगाबादमध्ये कुलरच्या पाण्यात पडलेली खेळणी काढताना चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - रमजान ईद
कुलरच्या पाण्यात पडलेली खेळणी काढण्यासाठी गेलेल्या ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रोजाबाग परिसरात घडली. रेहान इस्तीयक अन्सारी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
बुधवारी रेहान हा घरात खेळत असताना त्याची खेळणी घरातील कुलरच्या पाण्यात पडली. ती खेळणी काढण्यासाठी त्याने पाण्यात हात घातला असता पाण्यात वीजप्रवाह उतरला व त्याला शॉक लागून तो बेशुद्ध पडला. रेहानला बघण्यासाठी आई खोलीत आली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच चिमुकल्या रेहानची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत रेहानने दोन दिवसांपूर्वीच पहिल्यांदा रोजा धरला होता. दरम्यान, रेहानच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.