महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैठण : गंगेश्वर महादेव मंदिराच्या गाभार्‍यात पिंडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला युवक - Dead body found in paithan

पैठण येथील महादेव मंदिरात रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मासेमारी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाने स्वतः पिंडीवर डोके फोडून घेतले की त्याची हत्या करण्यात आली की या घटनेचे आणखी काही वेगळे कारण आहे याचा तपास पैठण पोलीस करत आहे.

Paithan Crime
गंगेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आढळला रक्ताच्या थारोळ्यातील युवक

By

Published : Dec 10, 2020, 9:07 PM IST

पैठण (औरंगाबाद) - येथील गंगेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाच्या पिंडीवर रक्ताच्या थारोळ्यात एक युवक पडलेला आढळून आला. गावकऱ्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी युवकाला तातडीने रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.

काय आहे घटना

पैठण शहरातील गंगेश्वर मंदिरात सायंकाळची पूजा करण्यासाठी सहा वाजता भाविक जमा झाले. मंदिरातील गाभाऱ्याच्या साफसफाईसाठी गेलेल्या व्यक्तीला पिंडीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक युवक आढळून आला. त्या व्यक्तीने आरडोओरड करण्यास सुरुवात केली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. संबंधीतांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळवली. पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत युवकाचा श्वासोच्छास सुरु होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्याचे निर्देश उपनिरीक्षकांनी दिले. पैठण शासकीय रुग्णालयात युवकाला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी युवकाला तपासून मृत घोषित केले आहे.

हत्या की आत्महत्या, पैठणमध्ये चर्चा

मृत युवकाची ओळख पटली असून तो कहारवाडा येथील रहिवासी होता. मृताचे नाव नंदू घुंगासे (वय २६) असल्याचे पोलीसांनी सांगितले. नंदू जायकवाडी धरणात मासेमारीचे काम करुन उदरनिर्वाह चालवत होता. पोलीसांना घटनास्थळी कोणतेही हत्यार सापडलेले नाही. युवकाने पिंडीवर डोके फोडून रक्ताचा अभिषेक करण्याचा प्रयत्न केला की त्यांची हत्या करण्यात आली याबद्दल पैठणमध्ये चर्चा सुरू आहे. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details