छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) DCM Ajit pawar on Samruddhi Expressway :वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग चांगलाच चर्चेत आलाय. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची अनेक कारणं सांगितली जात आहोत. यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे नाराजी व्यक्त केलीय. समृद्धी महामार्ग अत्यंत सरळ झालाय. यामुळं या महामार्गावर चालकाला फक्त सरळच बघावं लागतं. त्यामुळं त्यांचे कधी-कधी डोळे मिटतात आणि अपघात होतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समृद्धी महामार्गाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच अजित पवारांनी ही नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
का होतात अपघात :मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं (Cabinet in Chhatrapati Sambhajinagar) आयोजन करण्यात आलं होतं. तत्पुर्वी शहरातील वंदे मातरम सभागृहात विविध कार्यक्रमांचे उद्घाटन तसेच विकासकामांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवारांनी आपल्या भाषणातून विकासकामांवरुनही आपले मत व्यक्त करत, मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींचे कानही टोचले. राज्य शासनाने केलेल्या विकासकामांविषयी बोलताना अजित पवार समृद्धी महामार्गावर म्हणाले की, सरकारनं समृद्धी महामार्ग वेगात पूर्ण केला. पण, हा महामार्ग अत्यंत सरळ झालाय. लांबच लांब कोणत्याही व्यत्ययाशिवाय गाडी चालवताना एकप्रकारे गुंगी येण्याची शक्यता असते. या महामार्गावर चालकाला फक्त सरळच बघावं लागतं. आजुबाजूला बघायची गरज भासतच नाही, त्यामुळं चालकाचे डोळे कधी कधी मिटतात. यामुळं या महामार्गावर अपघात होतात. आता या महामार्गावर वळणे हवी होती का? अशी चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विशेष म्हणजे अजित पवारांनी हे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर केलंय, यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या.