औरंगाबाद - राज्य सरकारने कोरोनाच्या रुग्णांना मोफत उपचार केले पाहिजे. मात्र, गरीब रुग्णांना लाखांची बिलं भरावी लागत आहेत. या रुग्णांचे उपचाराचे पैसे जन आरोग्य योजनेतंर्गत परत द्या, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. सरकारने गरिबांचा पैसा परत केला नाही तर आम्ही आंदोलन देखील करायला मागे हटणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी औरंगाबादच्या पत्रकार परिषदेत दिला.
गरीब कोरोनाबाधितांच्या उपचाराचे पैसे परत द्या, अन्यथा आंदोलन - प्रवीण दरेकर
राज्य सरकारने कोरोनाच्या रुग्णांना मोफत उपचार केले पाहिजे. मात्र, गरीब रुग्णांना लाखांची बिलं भरावी लागत आहेत. या रुग्णांचे उपचाराचे पैसे जन आरोग्य योजनेतंर्गत परत द्या, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
आज मोदींजींनी देशात लॉकडाऊन केला म्हणून, देशाची परिस्थिती नियंत्रणात आहे. लॉकडाऊन नसता तर आज मोठ्या पटीने संख्या वाढली असती असेही प्रवीण दरेकर म्हणाले. संजय राऊत चर्चेत राहण्यासाठी काय टीका करतील? काय लेख लिहितील? याचा नेम नाही. कधी राज्यपालांवर टीका करतील किंवा कधी कौतुक करतील त्यांचा काही नेम नाही अशी टीका दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झालं त्याबाबतीत केंद्र सरकारच्या विकास कामांची माहिती देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याने ते शक्य झाले. कलम 370, ट्रिपल तलाख सारखे निर्णय झाले. राम मंदिराचा निर्णय मार्गी लागला आहे. देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी उपाय योजना केल्या, कोरोनाच्या काळात सर्वात आधी सतर्कता दाखवली आणि व्यापार उद्योग उभारणीसाठी भरीव तरतूद केली. शेतकऱ्यांसाठी मोकळीक देण्याची मागणी होती. त्यामुळे आता कोणत्याही बाजारपेठेत शेतीमाल विकण्याची मुभा मिळाली. शेतीमालाला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. हे अभिमानाचे निर्णय आहेत. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा चांगली करण्यासाठी ठोस उपाय योजना करण्यात आल्या असल्याचे सांगत प्रवीण दरेकर यांनी केंद्र सरकारच्या विकासकामांचा पाढा वाचला.