छत्रपती संभाजीनगर : सायबर सेलच्या सतर्कतेमुळे मुंबईतील स्टार रेज कंपनीचे 110 कोटी रुपये वाचले आहेत. कंपनीचे बँकिग खाते हॅक करत बँक खात्यातील रक्कम लंपास करणाऱ्या 6 जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबईतील स्टार रेज कंपनीच्या बँक खात्यात 110 कोटी रुपये असल्याची माहिती या आरोपींना मिळाली होती. त्यानंतर आरोपींनी कंपनीचे बँक खाते इंटरनेट बँकिंगचा वापर करून हॅक केले. हॅक केलेल्या बँक खात्यातून या पैशांचे रुपांतर क्रिप्टोकरेन्सी करत असल्याची माहिती सायबर सेल पोलिसांनी दिली.
हॉटेल देवप्रियामध्ये छापा : मुंबईतील स्टार रेज ही कंपनी हिऱ्यांचा व्यवसाय करते. या कंपनीचे खाते बँक ऑफ इंडिया या बँकेत असून त्यात 110 कोटी रुपये जमा असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्याआधारे आरोपींनी नेटबँकिंगचा वापर करून कंपनीचे बँक खाते हॅक केले. बँकेची वेबसाईट आणि कंपनीचे बँक खाते हॅक केल्यानंतर खात्यातील रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आरोपी करत होते. दरम्यान याची गोपनीय माहिती सायबर सेल पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहरातील हॉटेल देवप्रिया येथे छापा मारला. तिथे 6 जण इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ऑनलाईन 110 कोटी रुपयांची लूट वाचवली. या धाडीत पोलिसांना तर अन्य काही कार्पोरेट कंपन्यांची कागदपत्रे आढळून आल्याची माहिती सायबर सेल पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.