छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - घरी कुणी नसल्याची संधी साधत रांजणगाव परिसरातील दहा वर्षीय शाळकरी मुलावर 19 वर्षीय दोघांनी बळजबरी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अनिकेत रामराव दणके व इरफान उर्फ गोल्या सफर सय्यद यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूंज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी इरफान पोलिसांच्या ताब्यात असून अनिकेत मात्र फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम वाळूंज पोलीस करत आहेत.
आरोपीच्या घरी अत्याचार - आरोपी आणि पीडित मुलाच्या मोठ्या भावाशी किरकोळ वाद झाले होते. त्यामुळे यादोन्ही आरोपींनी पीडित मुलाच्या 13 वर्षीय मोठ्या भावाला घरी बोलवले होते. मात्र, तो अभ्यास करत असल्याने येणार नाही असा निरोप पाठवला. काही वेळाने लहान भाऊ घरी नाही बराच वेळ झाला तो दिसत नसल्याने तो त्याला शोधण्यासाठी बाहेर पडला. बराचवेळ शोधत असताना त्याला आवाज दिला असता आरोपी अनिकेत याच्या घरातून दादा मला वाचव असा आवाज आला. मोठ्या भावाने तातडीने घराकडे धाव घेत पाहिले असता, या दोन नशेखोरांनी त्या मुलाला घरी नेत आनैसर्गिक अत्याचार केल्याचे दिसून आले. या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दोन्ही आरोपींनी दोंघा भावांना दिली. मात्र, मोठ्या भावाने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.