औरंगाबाद- कन्नड ग्रामीण रुग्णालयात कोविड- 19 च्या वार्डात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हे वैद्यकीय अधिकारी राहत असलेला परिसर प्रशासनाने सील केला आहे. आता शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या नऊ, तर तालुक्यातील बाधित रुग्णसंख्या अकरावर पोहोचली आहे.
कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड 19 चे सेंटर असून येथील वॉर्डमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड 19 चे लक्षणे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या लाळेचा नमुना तपासण्यासाठी पाठवण्यात आला होता. शनिवारी सकाळी त्यांना लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
कन्नड शहरात आठ कोरोनाबाधित रुग्ण होते. मंगळवारी कानडगाव व देवगाव येथील प्रत्येकी एक असे दोन रुग्ण वाढल्याने आता तालुक्यातील रुग्णांची संख्या दहा झाली होती. आज शहरातील वैद्यकीय अधिकारी पॉझीटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
वैद्यकीय अधिकारी राहत असलेल्या भागास तहसीलदार संजय वरकड, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर, डॉ. प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले. वैद्यकीय अधिकारीच बाधित झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, लहान मुलांना आणि वृद्धांना बाहेर जाऊ देऊ नये, मास्क वापरावा, पाणी उकळून प्यावे, छोट्या कारणांसाठी दवाखान्यात जाऊ नये, आतापर्यंत जसा संयम दाखविला तसाच पुढील काळात दाखवावा, सॅनिटायझर वापरावे, सतत हात स्वच्छ करावे, असे आवाहन डॉ. प्रवीण पवार यांनी केले आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश सातव, कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक व संपूर्ण पोलीस कर्मचारी मार्चपासून कोरोना पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता देगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लांजेवार आणि सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारीही आपले कर्तव्य बजावत आहेत. तर स्वच्छता कर्मचारी नगर पालिका प्रशासन योग्य कार्यवाही करत असल्याने नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गटनेता संतोष कोल्हे यांनी केले आहे.