औरंगाबाद -गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीत प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. २६ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली. औरंगाबाद-पुणे महामार्गावर गोदावरी नदीत मध्यभागी सीमारेषा असल्याने मृत मुलीचा मृतदेह अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. तर मुलाचा मृतदेह तीन दिवसांनंतर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दात सापडला.
तीन दिवसांनी सापडला मुलाचा मृतदेह -
26 जानेवारीपासून पोलीस आत्महत्या केलेल्या मुलाचा शोध घेत होते. गुरुवारी सकाळी या मुलाचा मृतदेह गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. औरंगाबाद येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला आहे. मुलगी बजाजनगरची रहिवासी होती तर मुलगा तीसगावचा होता.
तणावातून केली आत्महत्या -
शुभम कनिच्छे व रेणुका घुगे यांचे एकमेकावर प्रेम होते. त्यांना लग्न करायचे होते. मात्र, आपल्या प्रेमसंबंधाला घरून विरोध होतो की काय या तणावाखाली दोघांनी 26 जानेवारीला कायगाव येथे गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. घटनेच्या तीन दिवसानंतर मुलाचा मृतदेह सापडला. त्याचे गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनकरून मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला. औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गोदावरी पुलावरून डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात 13 ते 14 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.