औरंगाबाद - कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा उपचारानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण राहिलेला नाही, असा दावा जिल्हा शल्य चिकित्सकांनी केला जात आहे.
कोरोना बाधित महिलेचा अहवाल आला निगेटिव्ह रशियाहून आलेल्या 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल 15 मार्चला जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळाला होता. त्यानंतर शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्या सर्वांचे अहवालही निगेटीव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला.
हेही वाचा -कोरोनाच्या प्रभावात राज्याची उपराजधानी लॉक डाऊन
दरम्यान, औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आठवडाभरात 52 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 30 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात काहीजण दुबईहून आलेले नागरिक, तर काही 59 वर्षीय महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारानंतर घेतलेले नवीन नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आता हा अहवाल निगेटिव्ह आल्याने ही महिला पूर्ण बरी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहवाल निगेटिव्ह आला असला तरी या महिलेला आणखी काही दिवस रुग्णालयातच देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. औरंगाबादेत जवळपास 100 पेक्षा जास्त संशयित रुग्णांचे घरीच विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.