औरंगाबाद -जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे. कोविड सेंटरवरील रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने अनेक रुग्ण रुग्णालयाबाहेर जागेसाठी प्रतीक्षा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णांनी उपचारासाठी जावं कुठे हा प्रश्न निर्माण होतोय.
जिल्ह्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ -
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. रोज पंधराशेच्या वर नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी दिवसभरात 1,406 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 30 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजाराच्या घरात गेली आहे तर मृतांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात रुग्णांना उपचार देण्यासाठी बेड शिल्लक नाहीत. उपचार घेण्यासाठी रुग्णांना कोविड सेंटर बाहेर प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येत आहे.
चिकलठाणा येथील कोविड सेंटरचा आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी घेतलेला आढावा खाटा वाढवण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या सूचना - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने खाटा वाढवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. शहरी भागात सीसीसी, डिसीएच आणि डिसीएचसी या उपचार सुविधांमध्ये 6014 खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये 1,244, डीसीएचसी मध्ये 225 खाटा उपलब्ध आहेत. तसेच वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा आणि खटांची उपलब्धता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खाटांच्या उपलब्धतेच्या माहितीसाठी काही क्रमांक जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
हे ही वाचा - सोमवारी राज्यात 24 हजार 645 कोरोनाबाधितांची नोंद
दोन दिवसांपूर्वी महिलेने केला व्हिडिओ प्रसारित -
दोन दिवसांपूर्वी कोविड संक्रमित महिला उपचार घेण्याकरिता महानगर पालिकेच्या कोविड सेंटरवर आली. जवळपास दोन तास तिला प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर महिलेला कोविड सेंटर मध्ये दाखल करून घेण्यात आले. रुग्णालयात गेल्यावर महिलेला धक्का बसला. कारण अनेक बेड रिकामे होते, कोणतेही रुग्ण उपचार घेत नव्हते. बेड शिल्लक असताना रुग्णांना प्रतीक्षा का करायला लावली जाते, असा प्रश्न महिलेला पडला. त्याबाबत वास्तव दाखवणारा व्हिडिओ तिने आपल्या मोबाईलवर चित्रित करत सोशल मीडियावर अपलोड केला. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याच प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा - अरे बाबा, मी हॉस्पिटलमध्येच होतो... अनिल देशमुखांनी दिले स्पष्टीकरण