औरंगाबाद -खेळ खेळल्याने आपले आरोग्य चांगले राहते असे म्हणतात. मात्र, औरंगाबादेत खेळणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा आजार वाढल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबादेत कोरोना रुग्णांचा आकडा बाराशेच्या पुढे गेला आहे. ही संख्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे वाढल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच रहा, असे आवाहन करण्यात येत असताना अनेकजण वेळ घालवण्यासाठी अनेकांच्या संपर्कात आल्याने काही दिवसातच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे समोर आले आहे.
कॅरम आणि पत्ते खेळणाऱ्या लोकांमुळे काही प्रमाणात वाढले कोरोनाचे रुग्ण
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच रहा, असे आवाहन करण्यात येत असताना अनेकजण वेळ घालवण्यासाठी अनेकांच्या संपर्कात आल्याने काही दिवसातच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे समोर आले आहे.
शहरात अनेक ठिकाणी नागरिक आपल्या परिसराच्या बाहेर पडले नाहीत. मात्र, त्या भागात रुग्णांची संख्या वाढली असल्याचे पाहायला मिळाले. वेळ घालवण्यासाठी आपल्या मित्रांकडे किंवा शेजारी पत्ते किंवा कॅरमसारखे खेळ खेळायला गेल्याने अनेकांचा संपर्क वाढल्यामुळे काही भागांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला असल्याचे दिसून आल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
औरंगाबादमधे गेल्या एका महिन्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला. एक महिन्यांपूर्वी 60 रुग्ण संख्या असताना महिनाभरात एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण शहरात आढळून आले. रुग्णांची वाढलेली संख्या चिंतेची बाब आहे. मात्र या परिस्थितीला नागरिक विशेषतः युवक जबाबदार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक युवक वेळ घालवण्यासाठी आसपास आपल्या मित्रांच्या किंवा शेजारी पत्ते किंवा कॅरमसारखे खेळ खेळायला जात आहेत. अनेकांचा संपर्क वाढल्यानेदेखील कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, आपण आपल्या घरात राहिलो तरच या आजाराला थांबवता येईल, असे मत मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केले.